
आज खरचं गावाकडच्या दिवाळी ची आठवण आली, गाव सोडून बरेच वर्ष झालीत पण गावाकडची दिवाळी म्हणजे खरच अस वाटत तीच खरी दिवाळी होती.पण आता तिथलेही दिवस बद्लेत,बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे खर,पण त्यासोबत आपल्या चालीरीती,रिती भाती आपले संस्कार ह्यांची जपणूक सुधा केली पाहिजे आणि ती झालीच पाहिजे,आणि ते गावीच अजूनही करतात हे खूप समाधानकारक आहे.मुंबईमध्ये परंपरागत म्हणाल तर चाळी मध्ये बघायला भेटते अजूनही,पण बाकी ठिकाणी मुंबईत म्हणाल तर कायच नाही,फक्त नवीन कपडे,मिठाई आणि फटाके वाजवणे म्हणजे झाली दिवाळी,ना त्यात कसली आपुलकी ना प्रेम सगळे आपल्या आपल्यातच गुंतलेले. पण गावाकडच्या दिवाळीची मज्जा काही औरच.
जसा दसरा सण होतो ना होतो तशी लगेच दिवाळी सणाची लगबग चालू होयाची,आमची पण सहामाही परीक्षा संपत आलेली असायची सगळी कडे आनंदच वातावरण असायचं,आम्हाला परीक्षा संपल्या म्हणून आनंद होयाचा आणि घरातल्या बायकांना दसरा सण संपला आता दिवाळीच्या सणाच्या तयारीच्या आनंदात असायच्या. आज काय बनवायचं,आज कोण कोण येणार घरी फराळ बनवायला,कुणाच्या घरी फराळ बनवायला जायचं आहे, हे असच चालू असायचं दिवाळी येऊ पर्यंत सगळ्या बायकांचं.



चिली पिली असायची त्यांना तर आधीच सुट्ट्या पडलेल्या असायच्या,त्यामुळे त्यांचं किल्ले बनवायचं काम चालू असायचं.किल्ले बनवण्यासाठी सकाळी सकाळी पोरं नदीवर जायची लाल माती आणायला. मोठी पोरं त्यांना मदत करायची माती उकरून पोत्यात भरून द्यायला,ती पोती कशीबशी उचलून त्या पाण्याच्या गाड्यात टाकायची(पाणी लांबून भरून आणण्यासाठी लोखंडी गाडा असायचा गावी,अजूनही वापरतात गावी,त्याचा भरपूर ठिकाणी उपयोग व्हयाचा, वजी(ओझी वाहण्यासाठी ) ती पोरं गाडा ढकलत ढकलत भरलेली पोती घेऊन यायचीत. त्यांची ती होणारी धावपळ आठवून खूप हसायला येतंय.त्यावेळी एकच पोरांच्या लक्षात होत, दिवाळी आली म्हंटली कि आमचा किल्ला कसा मोठा आणि देखणा दिसणार हेच चालू असायचं.गावातल्या लोकांच्या कडून गावातली सगळी मंदिरे रंगवून घेतली जात,मस्त सजावट मंदिरांवर केलेली असे त्यामुळे दिवाळीत मंदिरे अजूनच देखणे आणि सुंदर दिसत.सगळी कडे दिव्यांनी उजळून गेलेली असत मंदिरे.
तिकडं बायकांचं प्रत्येकाच्या घरी जाऊन पटा-पटा फराळ बनवायचं चालू असायचं,देसाई काकूंच्या घरी चकल्या बनवायच्या,कांबळे मामीच्या घरी करंज्या बनवायच्या,त्यांच्या घरी लाडू, ह्यांच्या घरी शंकर पाळ्या हे सगळं असं चालू असायचं. दररोज प्रत्येकाच्या घरातनं खमखमीत वास यायचा, तस आम्ही टेस्ट करायला जायचो,त्यात काय वाद नव्हता,असं करत करत सगळ्यांच्या घरातला फराळ खाऊन चव चाखून झालेलं असायचं.
आम्ही पोरं सुट्टी असल्यामुळे दिवसभर क्रिकेटच्या ग्राउंड वर पडीक असायचो,सकाळी १० वाजता नाष्टा करून एकदा बाहेर पडलं की सरळ संध्याकाळी ४-५ वाजताच घरी परत यायचं,मग काय आल्या आल्या घरातल्यांच्या शिव्या खायचा नाहीतर मार खायचा मग दुसऱ्या दिवशी जायचं नाही, मग गप्प दुसऱ्या दिवशी गल्लीतच खेळत बसायचं नाहीतर हिकडं तिकडं बोंबलत फिरायचं.आणि घरी असलं कि मग घरात फराळ करायचा चालू असायचं,मग त्यात थोडी मदत करायची एवढं चालू असायचं.
मग हे खाऊन सांग कसं झालंय,ते खाऊन सांग,असं वाटायचं टेस्टिंग साठी माणूस बसवलाय. मग परत घरातल्यांशी भांडून परत दुसऱ्या दिवशी खेळायला.संध्याकाळी आलं की मग किल्ले बांधण्यासाठी मदत 😛 दिवसभर ती चिल्ली पिल्ली किल्ले बनवण्यात मग्न असायची मग आम्ही आलो कि मग जरा हातभार लावायचा. पण मज्जा यायची खूप.किल्याची सजावट, मावळे,महाराजांची मूर्ती हे सगळं चालू असायचं. आणि एक सांगायचं राहिलं,त्या सजावटी मध्ये महत्वाचा भाग होता तो म्हणजे आपल्या सलाईन बाटल्यांचा. एकदम खतरनाक उपयोग त्या बाटल्यांचा करायचेत पोरं. किल्याला तडे जाऊनयेत म्हणून थोड्या थोड्या वेळाने त्या बाटलीतुन किल्ल्यावर पाण्याची बारीक धार सोडायची,कारंज्या साठी त्या बाटल्यांचा उपयोग व्हॉयचा, डॉक्टर ओळखीचे असायचे त्यामुळे त्यांच्याकडून लगेच मिळून पण जायचे.किल्यांवर लक्ष देण्यासाठी पोरं डोळ्यात तेल घालून असायचीत,रात्री झोपताना मग किल्यावर प्लास्टिक कागद झाकून झोपून जायचीत. परत सकाळी उठून त्यांचं काम चालू, हि अशी दिनचर्या चालू असायची पोरांची दिवाळी संपूपर्यंत.
हे झालं त्यानंतर लगबग असायची खरेदी त्यातल्या त्यात खरेदी म्हणजे कपड्यांची खरेदी म्हंटल की मग झालंच,कसं होत ५वी पर्यंत मला आणि माझ्या भावाला एक सारखेच कपडे शिवून घ्यायचो नंतर मग काय दुकानातून उक्ते कपडे घ्यायचे.माझ्या वडिलांचे कपड्यांच्या बाबतीत खूप चांगली निवड असे. ते शिवायचे कपडे तर एवढे भारी निवडतात ना ,नाद नाही करायचा.कपड्यांची लगबग तर दिवाळीच्या आधी २-३ दिवस होत असे. काय ती गर्दी दुकानांमधून बाजारपेठ अशी खुलून गेलेली असे.सगळी कडे लगबग लगबग असे.दुकाने पार तुडुंब भरून गेलेली असतं.
दिवाळीत सगळं अंगण शेणाने सारवून घेतलेलं असायचं,सगळ्यांची दारं अशी मस्त सारवलेली असायची,त्यावर छान अशी रांगोळी काढलेली असायची(आता सुद्धा करतात नाही असं नाही ),मेन टेन्शन असायचं ते लहान मुलांचं कधी येऊन ते रांगोळीचा सत्यानाश करून जायचीत काय भरोसा नसायचा 😂😂😂.मस्त असे आकाश दिवे लावलेले असायचे,घर सजावट केलेलं असायचं.बाहेर घरच्या दाराला मस्त अश्या प्रकाश माळा लावलेल्या असायच्या.दारात दिवे लावलेले असायचे,सगळीकडे असा लख्ख प्रकाश झालेला असायचा,एक नंबर वाटतंय आठवून.

वातावरण असं थंड असायचं की नुसता हुडहुडी भरायची,त्यात आमच्या भागात उसाची शेती मोठया प्रमाणात केली जाते.त्यामुळे उसाच्या शेतीमुळे वातावरणात अजून जास्त गारवा जाणवायचा.
“अश्या थंडीत वडील सकाळी बरोबर ५ वाजता उठवायचे दिवाळीच्या पहिल्या अंघोळीसाठी,त्या थंडीत चादरीतून बाहेर पडूच वाटायचं नाही.कसतरी आपलं कुडकुडत उठायचं आणि जाऊन बसायचं सरळ बंबा जवळ शेकोटी घेत,तिथं आपलं वेळ काढत बसायचं लवकर अंघोळ करायला नको म्हणून.मग शिव्या खाऊन जायला लागायचं अंघोळीला. तेल आणि उटणं लावून आई अंघोळ घालायची(ते पण घासून घासून),मग अंघोळ झाली की नवीन कपडे घालून साहेब तयार.बाहेर सगळ्या बायका लवकर उठून आपापल्या दारात रांगोळी काढत असत,ज्यांना रांगोळी काढता येत नसे त्यांना दुसऱ्या बायका मदत करत असत.कोण सकाळी उठून दारात सडा मारत असे,कुणाची सकाळी साफसफाई चालू असे,अशी सकाळी सकाळी सगळ्यांची लगबग चालू असे.कुणाचे पाहुणे सकाळी सकाळी मुंबई- पुण्याहून आलेले असत,त्यांची ती लगबग चालू असे. नवीन कपडे घालून मग गावं सगळं भटकून यायचं मित्रांच्या सोबत.
त्यात भारी म्हणजे सहामाही परीक्षा संपलेली असायची,कसं तरी परीक्षा काढली म्हणायची. तर,कोणतरी मधी येऊन मग काशी करायचं. “त्यो पेपर कसा गेला, हा पेपर कसा गेला,ह्या प्रश्नाचं उत्तर मी असं लिहिलंय तू काय लिवलाईस उत्तर,सोडवलयीस नव्ह प्रश्न की नाही,अरे ह्याला ५ मार्क होत त्याला २ मार्क होत,हे मार्क गेलं ते मार्क गेलं ही असली बोंबाबोंब असायची.मग आमचा उत्साह असायचा त्यो सगळा गळून पडायचा(अशी एक एक मित्र असत्यात जन्माला पुजलेली ). मग काय त्यो निकाल लागू पर्यंत नुसता जीवाला घोर लागलेला असायचा.नुसता त्या परीक्षाचा विचार हे बरोबर लिहलंय काय ते बरोबर लिहलंय हेच आठवत बसायचं,नाहीतर गाईड उघडून उत्तर बघून आठवत बसून उगाच मनाला धीर देत बसायचं.कसं होत माहितीये काय कशी तरी परीक्षा द्यायची म्हणून द्यायची आणि नंतर उगच रडत बसायचं,माहितीये आपल्याला आपला काय निकाल लागणार हाय आणि आपल्या घरातले आपला काय निकाल लावणार आहेत ते😁😁😅😅.आता आठवलं आणि हसून डोळ्यात पाणी आलं.खरंच काय दिवस होते.’


धनत्रयोदशी च्या शुभ दिवशी लोंकाची सोन्याच्या दुकानात सोने खरेदीसाठी असलेली गर्दी,मग त्या दिवशी काही ना काही सोन्याची वस्तू घरी आणायची ,सोन नसेल तर चांदी असं काही ना काही वस्तू घरी आणण्याची लगबग असे,कुणाला जसे जमल तसं काही ना काही घेत असे.मग लक्ष्मी पूजनादिवशी संध्याकाळी पूजा झाल्या नंतर आरती करून दारात फटाकड्या वाजवण्याची रेलचेल चालू असे. चिल्लर पार्टीचा तर जोश एकदम जोरात असे(आम्हीपण चिल्लर पार्टीच होतो म्हणा त्यावेळी 😁).नवीन पाहुण्याची ओळख व्हॉयची😁 दिवाळी पाडवा आणि भाऊ-बीज झाली की दिवाळीची मजा अशी हळू हळू ओसरू लागायची,आलेले पाहुणे पण २-३ दिवसात निघून जायचे.मग जरा घर रिकामं रिकामं तसं गल्लीतले पाहुणे पण दिवाळी नंतर आपापल्या गावी निघून गेलेले असत,मग गल्ली पण जरा रिकामी रिकामी वाटे. तशी आमची अजून शाळेची सुट्टी संपायची असायची.मग घरातली कामे करायची वेळ यायची,सगळी आवराआवर.

हे झालं आता, दिवाळीचे दिवस संपले की मग, घरोघरी फराळ देण्या घेण्याचा कार्यक्रम चालू असायचा,मग आई म्हणायची ह्यांच्या घरी फराळ नेऊन दे त्यांच्या घरी फराळ नेऊन दे,त्यांनतर ह्यांचा फराळ खाऊन बघ कसा झालाय त्यांचा कसा झालाय,केलातर ह्यांनी सगळ्यांनी मिळूनच असतोय तरी बी असच😀.दिवाळी झाल्यानंतर मग आम्ही काकांच्या गावी जायचो ४-५ दिवसांकरिता.जाताना सगळा फराळ वैगरे बांधलेला असायचा आणि कपड्याची बॅग ,ती सगळी बोचकी उचलायची आणि सुटायचं सरळ गावाला.तिथं एक ४-५ दिवस सुट्ट्या घालवून येताना, तिथनं आणि फराळाची आणि कपड्याची बोचकी घेउन मग सरळ घराकडे.तिथून येताना लयी टेन्शन असायचं,४-५ दिवसात शाळा सुरु होणार असायच्या आणि आम्हाला माहित होत आम्ही काय दिवे लावलेत ते.घरी जाऊ पर्यंत नुसता धाकधूक धाकधूक असायचं.आणि घरी गेल्यावर मग काय सगळं अवसानच निघून गेलेलं असायचं.परीक्षा दिल्यांनतर सुट्टी पडली म्हणून जो जोश होता ना तो तर कुठल्या कुठं निघून गेलेला असायचा😁😁😎😎.
अश्यातच वडील घरी असताना कोण मित्र आला की मग काय, सगळी वाट लागायची.मित्र पण लयी भारी असायचे बरोबर पप्पा घरी असतानाच फराळाला यायचे.मग फराळ चालू असतानाच वडील आमच्या सगळ्यांचा निकाल बाहेर काढत 😁😂,काय रे परीक्षा कशी गेली ? किती टक्के पडतील? आमच्या ह्यांन काय दिवं लावलेत परीक्षेत? पास होणार काय ? हे असे सगळे प्रश्न असायचे. मग माझ्या मित्रांना काय तेव्हडाच चान्स,मला ७० पडतील,मला ६५ पडतील.६० च्या खाली कोण सांगणारच नाही बुवा.कारण आपण कवा ५० च्या पुढं गेलेलोच नाही. मग अजून घरात शिव्या, ते बघ जरा ती कशीं टक्केवारी काढतायत आणि तू बघ लेका काय करतोयस ५० च्या पुढं कधी गेलाईस काय.हे असं सगळं असायचं.म्हणजे त्यावेळी आमच्या घरच्यांना आमचा निकाल बघण्याची आणि कमी मार्क पडले तर आम्हाला तुडवून काढण्याची लगबग सुरु असायची. अशी आमची गावाकडची दिवाळी लगबग असायची😁😂😅😅.आता फक्त आठवणी राहिल्यात त्या मरे पर्यंत तश्याच मनात राहतील.
इथं कुठं असं बघायला मिळतंय,शहरात अस होण तर अशक्यच.आपल्या कडे कसं सकाळी लवकर उठून रांगोळी काढून दारात दिवे लावून दिवाळीची सुरुवात असे. इथं लोक म्हणतात सकाळी लवकर उठून कोण दिवं लावत,आम्ही इथे फक्त संध्याकाळीच दिवे लावतो😂😂 काय बोलणार ह्यांना आता.जुने दिवस आठवून खूप भारी वाटलं😁.
शुभ दिपावली!!!
धन्यवाद ! 😊😊