माझ्या राजा रं….माझ्या शिवबा रं…. -भाग १

महाराज मुजरा स्वीकारावा, महाराज तुमचा जन्म महाराष्ट्राच्या मातीत व्हावा म्हणून ह्या मातीने काहीतरी पुण्य केलं असेल नाहीतर ह्या मातीने तुम्हाला आशीर्वाद म्हणून मागितलं असेल. महाराष्ट्राने तो अनुभवलेला एक मोठा क्षण होता. महाराज तुमच्या जन्माच्या वेळी असं संपूर्ण आकाश असं भगव झालं असेल,समुद्राच्या लाटा अश्या उसळल्या असतील,वारा बेभान होऊन वाहत असेल,विजा कडाडल्या असतील.निसर्ग बेभान होऊन नाचला असेल.त्याला ही समजलं असेल,ह्या गुलामगिरीत अडकलेल्या रयतेसाठी एक नवी उमेद,एक नवी आशेची किरण घेऊन एक अवलिया जन्माला आला आहे, तुम्ही पारतंत्र्यात जगणाऱ्या ह्या रयतेला एक नवा श्वास दिलात. पारतंत्र्यात अडकलेल्या आणि गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडलेल्या मराठी जनतेला स्वातंत्र्याचा एक नवीन अनुभव दिलात.पण त्याच आता कुणालाच कवडीची ही किंमत उरली नाहीय,सगळं विसरून गेलेत महाराज, आपण निर्माण केलेलं स्वराज्य,तो इतिहास,तो एक तुम्ही राज मार्ग करून दिला होतात तो तर कधीच उखडून टाकला आहे
दुःखाची गोष्ट ही आहे की महाराज आपला इतिहासच लोकांना नीटसा माहीत नाही मुळात, मी माझ्या पासूनच सुरुवात करतो,मला इतिहास फक्त अफजलखानचा वध ते पण शाळेत शिकवलेला इतिहास हाच काय तो माहीत होता.आपला इतिहास कळायला मला 25 वर्ष लागली महाराज, खूप अस अपराधी असल्यासारखं वाटतं. माझी ही अवस्था असू शकते तर बाकीच्यांची तर काय विचारूच नका. नवीन पिढीला तर इतिहासाचा थांग पत्ताच नाही. कुणाला दोष द्यावा मग, हा एक मोठा प्रश्न आहे?
तुमचा इतिहास ही एक अशी गोष्ट आहे की,त्यावर किती ही लिहल किंवा वाचलं तरी खूप कमी आहे.आणि तुमच्या इतिहासाचा शोध तर चालूच आहे अजूनही.महाराष्ट्र म्हणजे काय? तर ते तुमचं नाव येतं आपुसक तोंडावर “छत्रपती शिवाजी महाराज” मराठी,मावळा हे नंतर जोडलं जात.मराठा म्हणजे एक दहशत होती मराठ्यांची,आता शेळी झालिये त्याच मराठ्यांची आणि मराठी माणसाची सुद्धा.
इतिहास कळणार कुणाकडून त्या मुलांना किंवा माझ्यासारख्या लोकांना जेंव्हा आम्ही लहान होतो तेंव्हा,आई वडिलांना पण कुठून इतिहास माहीत असणार,कारण त्यांच्या आई वडिलाकडून त्यांना माहिती मिळाली नसणार आहे,किंवा त्यांनी कधी प्रयत्न केला नसणार आहे तो जाणून घेण्याचा. त्या मुलांच्या आईवडिलांना च जर इतिहास माहीत नसेल तर ते काय मुलांना इतिहास सांगणार आहेत आणि काय त्यांना शिकवणार आहेत. माझ्याच घरचच घ्या, माझ्या पण आईवडिलांनी मला कधी इतिहास नाही सांगितला कारण त्यांनाच तो माहीत नाही. हीच अवस्था सगळ्या घरी आहे. सगळ्यांना शिवाजी महाराज माहिती आहेत पण त्यांचा इतिहास कुणाला जाणून घ्यायचा नाहीय किंवा तो पुढच्या पिढी पर्यंत पोहचवायाचा ही नाहीय. मी अस नाही म्हणत की सगळ्यांचेच आईवडील तसे असतील काही सांगत ही असतील आणि त्यांना माहीत ही असेल इतिहास. ह्या मध्ये कसं आहे जे शिकलेल नाहीत त्यांना माहीत आहे पण तोडका मोडका,आणि जे शिकलेले आहेत त्यांचा इतिहास हा फक्त परिक्षेपुरता होता अस म्हणायला हरकत नाही. आज जे ते पिढी वाढवतायत किंवा आधीच्या लोकांनी वाढवली ती फक्त आपली पोर शिकावीत कुठ तरी चांगली कामधंद्याला लागावीत हाच विचार करूनच,त्यात काय वाईट आहे म्हणत नाही मी पण,ह्यांच म्हणणं काय तर, काय करणार इतिहास बितीहास वाचून आणि एकूण त्यानं काय होणार हाय.हे अस किती ठिकाणी तरी ऐकायला मिळतंय.बरोबर आहे ना….असो.
पण महाराज एक गोष्ट मात्र पक्की आहे, तुमच्या जन्मोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत असतो दरवर्षी. दरवर्षी त्या उत्साहात साजरा ही होतो. एक त्यांचा हक्काचा दिवस आणि आपला दिवस असा वाटतो.काय तो जल्लोष लोकांचा काय ती लगबग अरे बापरे ते बघून काय भारी वाटत सांगू महाराज. तुमच्या मिरवणुकीची तयारी तर जल्लोषात चालू असते.
पण त्या दिवसासाठी पण आपल्याच लोकांच्यात मतभेद आहेत महाराज. त्यांना तुमचा जन्म कधी झाला?कोणत्या दिवशी झाला?कोणत्या नक्षत्रात झाला?ह्यावरून त्यांची भांडणे चालू आहेत.कोण म्हणतं तुमचा जन्म ह्याचं दिवशी झाला म्हणून आम्ही ह्या दिवशी साजरा करणार. कोण म्हणत तुमचा जन्म त्याच दिवशी झाला म्हणून आम्ही त्याच दिवशी साजरा करणार.तुमचा जन्म झाला ह्यावर तरी त्यांचं एकमत आहे,ही एक जमेची बाब आहे.महाराज,ते तेवढ्या दिवसा पुरताच उत्साह असतो,मग काय ये रे माझ्या मागल्या.इतिहास संवर्धन,किल्ले संवर्धन हे आता आता कुठे जरा लोकांना समजायला लागलंय.पण हे समजायच्या अगोदर किती नुकसान झाल असेल आपण फक्त कल्पनाच करू शकतो.
मी शाळेत असताना आमच्या तिथले मोठी मुले ही ज्योत घेऊन किल्ल्यांवर जायचीत,तिथून येऊन मग गावातून पण मशाल घेऊन पूर्ण गावाला वळसा घालून यायचे.त्यावेळी काय समजत नव्हत आम्ही फक्त ते कुतूहलाने बघायचो.त्यांच्या मागे मागे आम्ही पण धावयचो.दिवसभर मोठ्या स्पीकर वर पोवाडे आणि गीत लावलेले असायचे,सगळं बघायचो पण समजत नव्हतं काय चाललय ते.अस पण असेल की त्यातल्या बऱ्याचश्या मुलांना तुमच्या इतिहासाबद्दल माहिती ही नसेल!. पण ती मुलं एवढ्या उत्साहाने ते सर्व करायचीत खूप छान वाटायचं.पण त्यांनी पण आम्हाला कधी त्या इतिहासाबद्दल त्यावेळी नीटसं सांगितलं नाही आणि आम्ही ही तो त्यावेळी जाणून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही.
क्रमशः……………………………………………….








Khupach Chan. Jay Maharashtra