
महाराज मुजरा स्वीकारावा🙏, महाराज आपल्याला जाऊन ३५० – ४०० वर्षे लोटली तरी आपले अस्तित्व हे चंद्र सूर्या प्रमाणे आहे,आपल स्वराज्य आणि आपले गडकिल्ले कधी हे मिटवूही नाही देणार.महाराज आपल नसणं ही आम्हाला इतकं प्रेरणा देऊन जात,तर तुमच्या असण्याने त्या आमच्या मावळ्यांना काय प्रेरणा आणि काय ती ताकत मिळत असेल,विचार करूनच अंगावर शहारे येतात.जिथे जिथे तुमचे चरण स्पर्श झालेत तिथल्या जागेच सोन झालंय,ज्याला तुम्ही सोबत घेतलंत त्यानी स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावली, प्राणांची आहुती ही द्यायला तयार झाले. तुमचा सबुत कधी खाली पडू दिला नाही आणि तुमचा कधी विश्वास घालवला नाही.
स्वराज्यासाठी ते उभे राहिले, ना ऊन, वारा, पाऊस यांची कसलीच चिंता न करता,त्यांनी कधी विचारलं नाही ना कधी कुरबुर ही नाही केली. जे तुम्ही दिलं तेच गोड मानून आणि तुमचा आशीर्वाद समजून घेतलं. पण महाराज तुम्ही सुद्धा भरभरून दिलं त्यांनी काही न मागता.तुमचा एक शाबासकी चा हात पाठीवर पडावा म्हणून आसुसलेला तो मावळा.कधी त्यांनी असा विचार नाही केला माझ्या नंतर माझ्या कुटुंबाचं काय होईल,कधीच नाही.पण,आता तो एक दिवस होता आणि आजचा एक दिवस आहे. आज आपलीच लोक आपल्याच लोकांच्या जीवावर उठायला लागली आहेत.त्यावेळी ही होत नाही अस नाही पण तुम्ही दिलेली शिकवण, तुम्ही दिलेला स्वराज्याचा ठेवा हे सगळं विसरून गेलेत महाराज.
हे स्वराज्य उभं करताना, सर्व जातीतल्या लोकांना घेऊन हे स्वराज्य उभं केलत,पण आता जाती-पाती वरून आता दंगली होतायेत. लोकांमध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावावर भांडणे लावून ही राजकारणी आपल्या पोळ्या भाजून खात आहेत. तुमच्या नावाचा वापर करून लोकांचा विश्वासघात आणि दिशाभूल करण्याच काम चालू आहे. ह्या आताच्या ३-४ वर्षात लोकांना किल्ले संवर्धन आणि किल्ल्याचं महत्व पटत आलंय,पण ह्याच्या मागे जे नुकसान झालय ते कधीही न भरून निघण्यासारख आहे. शिवजयंती च्या नावाखाली नुसता धांगड धिंगा मिरवणुका.दारू पिऊन नुसता नंगा नाच चालू होता.आता कुठे थोडी सुबुद्धी सुचलीये लोकांना.
आताच्या पिढीला इतिहास म्हणजे एक कंटाळवाणा विषय बनलाय,परीक्षेपुरता उरलेला एक विषय आहे तो. काळानुसार बदल केला पाहिजे बरोबर आहे पण तो बदल आपला इतिहास, आपली संस्कृती, आपली वेशभूषा,आपले सण हे विसरून सगळ करणार असाल तर तो बदल नको आम्हाला. स्वराज्याचे मुख्य कारण होते ते आपले वडील शहाजीराजे भोसले, त्यांनी जर हे स्वप्न पहिले नसते तर ते तुमच्या हातून सत्यात उतरले नसते, आऊसाहेबांनी जर ती प्रेरणा ते संस्कार आपल्या मनावरती कोरले नसते तर आज हे स्वराज्य उभ राहील नसत. सगळ्यात महत्वाच म्हणजे तुमचा दृढनिश्चय त्यामुळे तर हे रयतेच राज्य,हिंदवी स्वराज्य उभं राहिल.
आमच्या लहानपणी आम्ही शिवजयंती पहिली ती एकदम छान आणि शांततेत असलेली,इतिहासाची माहितीपर चित्रण,पोवाडे,इतिहासाची पुस्तके अशी सर्व रेलचेल चालू असायची.आमचं एकच असायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हंटल की जय ते तेवढं मोठ्या आवजात घोषणा निघायच्या.पण दुर्दैव अस ते की आम्हाला त्या नावामागचा ना इतिहास माहित होता ना त्या मागचं बलिदान माहित होते.🙏🙏